पुणे : प्रतिनिधी
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील ८६५ गावांचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश करावा, या मागणीसाठी तसेच १ नोव्हेंबर रोजी सीमाभागात पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत हे आंदोलन शांततेत पार पडले.
आंदोलनाच्या सुरुवातीला विश्वनाथ पाखरे यांनी प्रास्ताविक करत धरणे आंदोलनामागील भूमिका स्पष्ट केली. १९५६ पासून सीमाभागातील मराठी बांधवांवर होत असलेला अन्याय, मराठी शाळा बंद करण्याचे कथित षड्यंत्र, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचे प्रकार आणि मराठी तरुणांवर दाखल होणारे खोटे गुन्हे या मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाच्या दाव्याबाबत केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी उत्तम तरळे, विजय पाटील, एस. आर. पाटील, उदय पाटील, बाबासाहेब पाटील, रुपेश सुळकर, व्यकाप्पा पाटील, संतोष पाटील, आराध्या गणपत पाटील आणि हणमंत पाटील यांनी आपले विचार मांडले. सीमाभागातील मराठी बांधवांच्या लढ्याला पुणेकरांचा ठाम पाठिंबा असून, न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा निर्धार सर्व वक्त्यांनी व्यक्त केला.
या धरणे आंदोलनाची सांगता कु. आराध्या वैराळ सुळकर हिने सादर केलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या स्फूर्तिदायी महाराष्ट्र गीताने झाली.
या आंदोलनात गणपत पाटील, सातेरी पाटील, मारुती पाटील, वैराळ सुळकर, अर्जुन वीर, गंगाराम वीर, संतोष कुंभार, नारायण पाटील, शिवाजी चदगडकर, राहुल चन्नेवाडकर, संदीप बिडकर, हणमंत पाटील, नितीन कुर्लिंग, भरत पाटील, एम. सी. पाटील, परशराम पाटील, संदीप बर्वे, चंद्रकांत काकडे, आर्य वारुनेकर, मुरलीधर देसाई, किरण राणाप्पा पाटील, सचिन पाटील, भुजंग गोविंद पारखे, पांडुरंग करविनकोप, हरीनंद मिराशी, ज्योतीबा तिनेकर, गंगाराम चनोवाडकर, हेमंत तवर, पांडुरंग कुलम, सिद्धू वाकाले, शिवानंद चन्नेवाडकर, पांडुरंग पाटील, परशराम निलजकर, नारायण कृष्णाप्पा पाटील, बाळकृष्ण गुंडप, दीपक पाटील, शांताराम पेडणेकर, श्रीकांत मिराशी, निंगाप्पा पाटील, मारुती कुलम, विद्याधर पाटील, मंगेश वंजारी, मानिक पाटील, मोतीलाल बेंद्रे, हनुमंत देसाई, विठ्ठल पाखरे, राहुल घाडी, ज्ञानेश्वर पाटील, भरमानी पाटील, धानाप्पा पाटील, नागराज पाखरे, कु. स्नेहा पाटील, कु. गायत्री पाटील तसेच मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांचे सहकारी संदीप बर्वे, सोनालीताई आदी उपस्थित होते.
धरणे सत्याग्रहाच्या समारोपानंतर उपस्थितांनी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तेथे गृहशाखेतील अधिकारी संतोष कोचवाड यांच्याकडे सीमाप्रश्नाबाबतचे निवेदन सादर करण्यात आले.
सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि ८६५ गावांचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश करण्याच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
