नवरत्न सन्मानाने श्री गणेश फेस्टिवलची यशस्वी सांगता

नवरत्न सन्मानाने श्री गणेश फेस्टिवलची यशस्वी सांगता

बेळगाव : गेल्या २७ वर्षांपासून बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला विधायक आणि सामाजिक दिशा देणाऱ्या श्री गणेश फेस्टिवलचा यंदाचा सोहळा नवरत्न सन्मानाने उत्साहात संपन्न झाला. बुधवारी सायंकाळी गुड शेड रोड येथील श्री माता सभागृहात आयोजित नवरत्न सत्कार सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नऊ मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

यावर्षीच्या श्री गणेश फेस्टिवलला ६ सप्टेंबरपासून सुरुवात झाली होती. गेल्या तीन दिवसांत महिलांसाठी विविध स्पर्धा तसेच नक्षत्र ग्रुपतर्फे आयोजित मंगळागौर लोकसंस्कृतीचा कार्यक्रम गणेशभक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. फेस्टिवलच्या अंतिम दिवशी नवरत्न सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी समाजसेवक म्हणून श्री अवधूत तुडवेकर, साहित्यरत्न म्हणून सौ. शोभा नायक, सामाजिक संस्था म्हणून समर्पण यूथ फाऊंडेशन, श्रमसेवा म्हणून सौ. आशा पत्रावळी, संगीतरत्न म्हणून श्री अशोक परांजपे, क्रीडारत्न म्हणून ललिता गवस, कलारत्न म्हणून श्री अजित औरवाडकर, उद्योगरत्न म्हणून आयडियल प्रॉडक्टचे समीर लोकूर आणि कृषिरत्न म्हणून श्री राजू मर्वे यांचा गौरव करण्यात आला.

गणेश फेस्टिवल समितीचे अध्यक्ष मनोहर देसाई, मनोरमा देसाई, रूपाली जनाज, डॉ. मीना पाटील, प्रतिभा नेगिनहाळ, अनुराधा देसाई, श्वेता देसाई, श्रीकांत काकतीकर, मारुती देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते नवरत्नांचा शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ, प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सत्कारमूर्तींनी या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

‘गणेश फेस्टिवल हा संस्कृती जपण्याचा उत्सव’

प्रास्ताविकात मनोहर देसाई म्हणाले की, गणेश फेस्टिवल हा केवळ उत्सव नसून संस्कृती जपण्याचा आणि समाजप्रबोधनाचा उपक्रम आहे. समाज एकसंघ राहावा यासाठी या व्यासपीठाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. तळागाळातील व्यक्तींच्या कार्याचे कौतुक व्हावे आणि उपेक्षितांना त्यांच्या कार्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

नवरत्न सन्मान हा सद्गुणांचा सन्मान आहे, असेही मनोहर देसाई यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीकांत काकतीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विलास अध्यापक यांनी आभार मानले, तर वसुधा सांबरेकर यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाला श्री माता सोसायटी, श्री राजमाता सोसायटी आणि श्री भक्ती सोसायटीचे संचालक व पदाधिकारी, ज्ञानमंदिर इंग्रजी शाळेतील शिक्षिका व कार्यकारी वर्ग तसेच गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two + 20 =

error: Content is protected !!