बेळगाव : भारत विकास परिषदेच्या वतीने राष्ट्रीय समूहगायन स्पर्धेचे आयोजन रविवार, २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता संत मीरा शाळेच्या माधवाश्रम सभागृहात करण्यात आले आहे. या स्पर्धेत हिंदी देशभक्तीगीत आणि लोकगीत (मराठी/कन्नड) अशा दोन विभागांमध्ये स्पर्धा होणार असून, अधिकाधिक शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
हिंदी विभागातील विजेत्या संघाला रोख ५,००० रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकाला ३,००० रुपये, तृतीय क्रमांकाला २,००० रुपये तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी १,००० रुपये देण्यात येणार आहेत. लोकगीत स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक स्मृतिचिन्हे दिली जाणार असून, सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येईल.
स्पर्धेत इयत्ता ६ वी ते १२ वी मधील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. प्रत्येक समूहात किमान ६ आणि कमाल ८ विद्यार्थी असणे आवश्यक असून, वाद्यसंगतीसाठी अतिरिक्त ३ सहकाऱ्यांना परवानगी असेल. मात्र, विद्युत संचलित वाद्यांना परवानगी नाही. प्रत्येक समूहाला सादरीकरणासाठी कमाल ७ मिनिटांचा कालावधी दिला जाईल.
हिंदी विभागासाठी भारत विकास परिषदेतर्फे प्रकाशित ‘चेतना के स्वर’ या पुस्तकातील गीतच सादर करणे बंधनकारक आहे, तर लोकगीत विभागात कोणतेही मराठी किंवा कन्नड लोकगीत सादर करता येईल. स्पर्धेचे परीक्षण संगीतरचना, शब्दोच्चार, स्वर, ताल आणि एकूण प्रभाव या निकषांवर केले जाईल.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा शाळा समूह प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरेल. त्यानंतर प्रांतविजेता दक्षिण भारत विभागीय स्तरावर, तसेच विभागीय विजेता राष्ट्रीय स्तरावरील समूहगायन स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहे.
अधिक माहितीसाठी ८७९२२५८४७७ किंवा ७०१९७२४२४८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
