बेळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित २०२६ च्या सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत बेळगावमधील अनगोळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव श्री राम युवक मंडळ, राजहंस गल्ली यांच्या गणेशोत्सवाने राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. या यशामुळे राजहंस गल्लीच्या राजाचा डंका आता देशभरात घुमत असून बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
भक्ती, एकता, सामाजिक बांधिलकी आणि परंपरेचा अभिमान यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या राजहंस गल्लीच्या राजाने आपल्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर छाप उमटवली आहे. या उल्लेखनीय यशामुळे मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, डॉ. किरण कुलकर्णी, पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर, अभिनेते सागर कारंडे, पंढरीनाथ कांबळे आणि जयवंत वाडकर यांच्यासह देशभरातील मूर्तिकार, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजहंस गल्लीच्या राजाने राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या या यशामुळे बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आणि सामाजिक कार्याची ओळख देशभर पोहोचली आहे. या यशाबद्दल श्री राम युवक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
