बेधडक बेळगाव वृत्तसेवा | बेळगाव
श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान रविवारी रात्री तुंबळ हाणामारीत झाले. बेळगावच्या टेंगिनकेरा गल्ली परिसरात रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या हाणामारीत सहा जण जखमी झाले असून, घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करून जमाव पांगवावा लागल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी परस्परविरोधी दोन एफआयआर दाखल करण्यात आले असून, दोन्ही गटांतील सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये राजू शेडगे, विशाल ताशीलदार (दोघेही रा. टेंगिनकेरा गल्ली), सतीश घसारी (रा. रुक्मिणी नगर), विनीत बडबंजी (रा. माळी गल्ली), सुजल कोळी (रा. जालगार गल्ली), अक्षय गडकरी आणि संकेत अष्टेकर (दोघेही रा. खडक गल्ली) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादाचा जाब विचारण्यासाठी काही जण गेले असता दोन्ही गटांमध्ये वाद वाढला. रविवारी रात्री ११ ते साडेअकराच्या दरम्यान भेंडी बाजार सर्कल, टेंगिनकेरा गल्ली कॉर्नर परिसरात दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी काठ्या आणि विळ्याने मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
या घटनेनंतर परिसरात एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बर्मनी, मार्केट विभागाचे एसपी संतोष सत्यनायक, माळमारुती पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिरची यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तानंतर विश्रांती घेत असलेल्या पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने घटनास्थळी दाखल व्हावे लागले.
या प्रकरणी आदित्य राजू अळवणी (रा. खडक गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका गटातील १५ हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर राजू शेडगे (रा. टेंगिनकेरा गल्ली) यांच्या फिर्यादीवरून दुसऱ्या गटातील १५ हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दोन्ही प्रकरणांत एकूण २६ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती असून, एका प्रकरणातील ११ तर दुसऱ्या प्रकरणातील १५ जण फरारी आहेत. पोलिसांनी रात्री उशिरा सात जणांना ताब्यात घेऊन अटक केली असून, उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
