नंदगडच्या कबड्डी स्पर्धेत म. मं. ताराराणी महाविद्यालयाच्या मुलींची दमदार कामगिरी; उपविजेतेपदासह ११ हजारांचे पारितोषिक

नंदगडच्या कबड्डी स्पर्धेत म. मं. ताराराणी महाविद्यालयाच्या मुलींची दमदार कामगिरी; उपविजेतेपदासह ११ हजारांचे पारितोषिक

बेळगाव : खानापूर तालुक्याचा मानबिंदू असलेल्या मराठा मंडळाच्या म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी कबड्डी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे. नंदगड येथील तरुण क्रीडा मंडळातर्फे आयोजित ६७ व्या भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेतील महिला विभागात ताराराणी महाविद्यालयाच्या संघाने उपविजेतेपद पटकावत आकर्षक चषक आणि ११ हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळविले.

या स्पर्धेत एकूण १० नामांकित संघांनी सहभाग घेतला होता. ताराराणी महाविद्यालयाच्या मुलींनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजविले.

पहिल्या सामन्यात ताराराणीच्या संघाचा सामना गदग-केळगेरी येथील बलाढ्य राष्ट्रीय संघाशी झाला. या सामन्यात ताराराणीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत प्रतिस्पर्धी संघाला दोन वेळा ऑलआऊट केले. परिणामी २७-७ अशा मोठ्या फरकाने विजय मिळवून स्पर्धेत दमदार सुरुवात केली.

त्यानंतर उपांत्य फेरीत बेळवट्टी संघाविरुद्ध झालेल्या चुरशीच्या सामन्यात ताराराणीच्या मुलींनी २३-१८ अशा फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात सांगलीच्या तुल्यबळ संघाविरुद्ध त्यांनी शेवटपर्यंत झुंजार लढत दिली. मात्र, अखेरीस उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेत कुमारी पल्लवी पाटील (कुप्पटगिरी) हिने विशेष चमक दाखविली. सामन्यात सर्वप्रथम पकड नोंदविल्याबद्दल माजी जिल्हा पंचायत सदस्य पुंडलिक कारलगेकर यांनी ठेवलेले ११०० रुपयांचे विशेष रोख पारितोषिक तिने पटकावले.

या यशस्वी संघात दिव्या शिरोडकर (शिवठाण), पल्लवी पाटील (कुप्पटगिरी), रेणुका गुरव (गणेबैल), कार्तिकी लोकुळोचे (धामणे) आणि धनश्री भोसले (लालवाडी) यांचा समावेश होता.

मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनामुळे महाविद्यालयातील विद्यार्थिनी क्रीडा क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. या यशाबद्दल मराठा मंडळाचे संचालक शिवाजीराव पाटील, परशराम गुरव, प्राचार्य अरविंद पाटील आणि मुख्याध्यापक राहुल जाधव यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच मार्गदर्शक प्रशांत पांखरे आणि भीमसेन या प्रशिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक केले.

ताराराणी महाविद्यालयाच्या मुलींनी मिळविलेल्या या यशामुळे खानापूर तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 2 =

error: Content is protected !!