खानापूर : मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर येथे ‘क्रांती सप्ताह’ उपक्रमाचा उत्साहात प्रारंभ झाला आहे. विद्यार्थिनींमध्ये राष्ट्रभक्ती, त्याग, शौर्य आणि कर्तव्यभावना जागृत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, दररोज एका महान क्रांतिकारकाच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी इतिहास विद्यार्थिनींसमोर मांडला जात आहे.
मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्याच परंपरेचा भाग म्हणून स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी ‘क्रांती सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे.
उपक्रमाच्या प्रारंभी कन्नड विभागाचे प्रा. आर. व्ही. मरीतमनवर यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यगाथेवर भाष्य केले. त्यानंतर कॉमर्स विभागाचे प्रा. पुंडलिक कर्लेकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या राष्ट्रभक्तीपूर्ण जीवनकार्याचा प्रेरणादायी इतिहास विद्यार्थिनींसमोर उलगडला.
या सप्ताहात पुढील दिवसांमध्ये शहीद भगतसिंग, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, तात्या टोपे, शहीद सुखदेव आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्यावर विविध प्राध्यापक व्याख्याने देणार आहेत.
विद्यार्थिनींना आपले विचार व्यक्त करता यावेत यासाठी महाविद्यालयात ‘अभिप्राय पेटी’ ठेवण्यात आली असून, उत्कृष्ट अभिप्रायांना बक्षिसेही देण्यात येणार आहेत.
महाविद्यालयाचा हा उपक्रम विद्यार्थिनींमध्ये देशभक्ती, सामाजिक उत्तरदायित्व, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा रुजविणारा ठरत असून, उपस्थितांकडून त्याचे कौतुक होत आहे.
