बेळगाव : हंगरगा गावात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एक कुटुंबाचा संपूर्ण संसार भस्मसात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राजू भर्मा पाटील यांच्या घराला अचानक आग लागून घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले.
या आगीत विशेषतः मुलीच्या लग्नासाठी मोठ्या आशेने साठवून ठेवलेले साहित्यही नष्ट झाले असून कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, संकटात सापडलेल्या या कुटुंबाच्या मदतीसाठी लक्ष्मीताई फाउंडेशन पुढे सरसावले आहे. घटनेची माहिती मिळताच फाउंडेशनच्या वतीने तातडीने आर्थिक मदत देण्यात आली.
“अडचणीच्या काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हेच खरे मानवतेचे लक्षण आहे,” असा संदेश देत कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
राजू पाटील यांच्या कुटुंबाला या कठीण प्रसंगाचा सामना करण्याची शक्ती मिळावी, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
