व्हॅक्सिन डेपो महामेळावा प्रकरणी समिती नेत्यांची निर्दोष मुक्तता; सरकारी पक्षाचे आरोप ठरले अपुरे

व्हॅक्सिन डेपो महामेळावा प्रकरणी समिती नेत्यांची निर्दोष मुक्तता; सरकारी पक्षाचे आरोप ठरले अपुरे

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २०१७ मध्ये व्हॅक्सिन डेपो मैदानावर विनापरवानगी महामेळावा भरवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. चौथे जेएमएफसी न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती.

या प्रकरणात समितीचे दिवंगत अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किनेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने सर्वांना निर्दोष मुक्त केले.

१३ नोव्हेंबर २०१७ रोजी हलगा येथील सुवर्ण विधानसौध येथे कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन पार पडत होते. या अधिवेशनाच्या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने व्हॅक्सिन डेपो मैदानावर मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला होता. प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान लागू असलेल्या कलम १४४ च्या आदेशाचे उल्लंघन करून हा मेळावा घेण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

तत्कालीन टिळकवाडी पोलीस निरीक्षक मोनेश देशमुख यांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करणे आणि भाषणांमुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात सरकारतर्फे आठ साक्षीदारांची नोंद करण्यात आली होती.

मात्र न्यायालयीन सुनावणीदरम्यान पोलिसांकडून कोणतेही व्हिडिओ पुरावे, वर्तमानपत्रांची कात्रणे तसेच वापरलेले ध्वनीवर्धक साहित्य सादर करण्यात आले नाही. या त्रुटी वकिलांनी ठळकपणे मांडल्याने सरकारी पक्षाचे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.

या खटल्यात समितीतर्फे अ‍ॅड. महेश बिर्जे, अ‍ॅड. एम.बी. बोंद्रे, अ‍ॅड. बाळासाहेब कागणकर, अ‍ॅड. वैभव कुट्रे, अ‍ॅड. अश्वजीत चौधरी आणि अ‍ॅड. रिचमन रिकी यांनी बाजू मांडली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 1 =

error: Content is protected !!