‘सेल्फी विथ प्लांट’ स्पर्धेतून ताराराणी पी.यू. कॉलेजचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

‘सेल्फी विथ प्लांट’ स्पर्धेतून ताराराणी पी.यू. कॉलेजचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

खानापूर : प्रतिनिधी

खानापूर येथील मराठा मंडळ शिक्षण संस्था संचलित ताराराणी पी.यू. कॉलेजमध्ये ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘सेल्फी विथ प्लांट’ या अनोख्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सुमारे २०० रोपट्यांची लागवड करून त्यांची नियमित निगा राखली. या रोपट्यांची वाढ, देखभाल आणि विद्यार्थ्यांनी घेतलेली काळजी यांचे निरीक्षण करून स्पर्धेतील विजेत्यांची निवड करण्यात आली.

५ जून रोजी सुरू झालेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश तरुण पिढीमध्ये निसर्गाविषयी प्रेम, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करणे हा होता. आपल्या परसात, अंगणात किंवा शेतात रोप लावून त्याची काळजी घेण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध रोपट्यांसोबत कल्पक सेल्फी काढून डिजिटल माध्यमांतून वृक्षारोपण आणि हरित परिसराचे महत्त्व अधोरेखित केले.

मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आणि पर्यावरणप्रेमी डॉ. राजश्री नागराजू (हलगेकर) यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. निसर्गावरील प्रेम आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाला या उपक्रमातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण अभियान यशस्वीपणे पार पडले. विशेष म्हणजे, दुष्काळी परिस्थिती असतानाही विद्यार्थिनींनी जिद्दीने आणि काळजीपूर्वक रोपट्यांची निगा राखली. विद्यार्थ्यांनी लावलेल्या जवळपास २०० रोपट्यांची वाढ आणि देखभाल यांचे बारकाईने निरीक्षण करून स्पर्धेचे निकाल निश्चित करण्यात आले.

स्पर्धेतील विजेते

  • प्रथम क्रमांक: कु. वेलंका मस्करीन — द्वितीय वाणिज्य
  • द्वितीय क्रमांक: कु. राधिका हंडी — प्रथम वाणिज्य
  • तृतीय क्रमांक: कु. कीर्ती कुट्रे — द्वितीय वाणिज्य

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राध्यापक एन. ए. पाटील, टी. आर. जाधव, पी. व्ही. कर्लेकर, आर. व्ही. मरितमनवर, मंगल देसाई, सुनिता कणबरकर, जयश्री शिवटणकर, वनिता गावडे, नितीन देसाई तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाप्रती संवेदनशीलता वाढण्यासोबतच पर्यावरणाचे रक्षण करण्याची आणि जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्याची प्रेरणा निर्माण झाली. संस्थेचे संचालक शिवाजी पाटील, परशराम गुरव आणि प्राध्यापकवर्गाने सर्व विजेत्या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 3 =

error: Content is protected !!