बेळगाव : संगोळ्ळी रायण्णा फर्स्ट ग्रेड युनिट कॉलेजच्या नेतृत्वाखाली कित्तूर राणी चन्नम्मा विद्यापीठाची २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील आंतरमहाविद्यालयीन एकल विभागीय हॉकी स्पर्धा गुरुवारी (८ ऑक्टोबर) टिळकवाडी येथील लेले (सुभाषचंद्र) मैदानावर आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत बेळगाव आणि विजापूर जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांच्या १४ संघांनी सहभाग घेतला.
बेळगाव हॉकीचे सरचिटणीस सुभेदार सुधाकर चालके यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, खेळाडूंसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य महत्त्वाचे असून, क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्यासाठी दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांनी मोबाईल बाजूला ठेवून मैदानावर यावे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारण्यासोबतच शारीरिक सक्रियताही वाढते. खेळ आरोग्यासाठी प्रभावी असून, प्रत्येक विद्यार्थ्याने क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपली क्षमता सिद्ध करावी.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संगोळ्ळी रायण्णा फर्स्ट ग्रेड युनिट कॉलेजचे प्राचार्य प्रा. एस. सी. पाटील यांनी तरुणांनी खेळाचे महत्त्व जाणून घ्यावे आणि खेळातून खिलाडूवृत्ती विकसित करावी, असे आवाहन केले.
यावेळी महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. करुणा आम्रिस्कर उपस्थित होत्या. हर्षिता यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले, तर रुपाली अनिल गोडा आणि नेत्रा जवेजर यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. डॉ. महांतेश डी. यांनी सूत्रसंचालन केले.
बेळगाव आणि विजापूर जिल्ह्यांतील १४ महाविद्यालयीन संघांच्या सहभागामुळे या स्पर्धेत चुरशीचे सामने पाहायला मिळाले.
