बेळगाव : प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची भावना जपत अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामच्या वतीने नेपाळसाठी २० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. क्लबच्या अध्यक्षा राजश्री हसबे यांनी मदतीची रक्कम अलायन्सच्या आंतरराष्ट्रीय सदस्या डॉ. नवीना शेट्टीगार यांच्याकडे सुपूर्द केली.
गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. अलायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने मानवतेच्या भावनेतून गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामने आर्थिक मदत दिली. या सहकार्याबद्दल डॉ. नवीना शेट्टीगार यांनी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
या मदतकार्यासाठी संजीविनी फाउंडेशनच्या डॉ. सविता देगीनाळ आणि शरद पाटील यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी क्लबचे सचिव पुरुषोत्तम हसबे, खजिनदार जीवन कदम, नीलम कदम, राम गुरव, मधुरा गुरव, ज्योती गवी, दीपाली देसाई, रेखा बामणे आणि मनोहर कालकुंद्रीकर उपस्थित होते.
