बेळगाव : प्रतिनिधी
बेळगाव शहर देवस्थान मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या दसरा महोत्सवातील सीमोल्लंघन सोहळ्यासाठी महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगली आणि महापालिका आयुक्त एम. कार्तिक यांना मंडळाच्या वतीने निमंत्रण देण्यात आले.
यावेळी बेळगाव शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, सचिव परशराम माळी यांच्यासह विकास कलघटगी आणि गणेश दड्डीकर उपस्थित होते.
यंदा मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता ज्योती कॉलेज येथील विद्याविनिकेतन मैदानावर दसरा महोत्सवांतर्गत सीमोल्लंघन सोहळा पार पडणार आहे. या पारंपरिक सोहळ्याला शहरातील सर्व गल्लींच्या पंच कमिट्यांचे पदाधिकारी, युवक मंडळांचे कार्यकर्ते, देवस्थानांचे मानकरी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
चव्हाट गल्लीतील पंच कमिटीच्या वतीने श्री ज्योतिबा देवाची सासनकाठी आणि नंदी यांची विधिवत पूजा करून मुख्य मिरवणुकीस प्रारंभ होईल. त्यानंतर शहरातील विविध देवदेवतांच्या पालख्या आणि सासनकाठ्या हुतात्मा चौकात एकत्र येतील. चव्हाट गल्लीतील पालखी, सासनकाठी व नंदी यांना अग्रभागी ठेवून ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात मिरवणूक सीमोल्लंघन मैदानाकडे मार्गस्थ होईल.
या सोहळ्याला बेळगावच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. यानिमित्ताने बेळगावचे वतनदार पाटील घराण्याकडे असलेल्या पारंपरिक तलवारीचे चव्हाण-पाटील परिवार आणि देवस्थान मंडळाच्या वतीने शस्त्रपूजन करण्यात येणार असून, उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
दसरा महोत्सवाची परंपरा जपत हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व देवस्थान मंडळांचे पदाधिकारी, मानकरी, पुजारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील आणि सचिव परशराम माळी यांनी केले आहे.
