बेळगाव : तामिळनाडूतील ऐतिहासिक तंजावर येथे राजे सरफोजीराजे भोसले (द्वितीय) यांच्या जयंतीनिमित्त २३ सप्टेंबर २०२६ रोजी ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनासाठी बेळगावातून मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
संमेलनाच्या अनुषंगाने तंजावरला जाण्याचे नियोजन, प्रवास व्यवस्था, सहभागी सदस्यांची नोंदणी तसेच इतर आवश्यक बाबींवर चर्चा करण्यासाठी बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता यश ॲटो, कॉलेज रोड, बेळगाव येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगावचे सर्व पदाधिकारी व सदस्य, शिवसंदेश भारत समूहाचे सदस्य तसेच साहित्यप्रेमी बांधवांनी या बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील आणि जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी केले आहे.
तंजावरच्या ऐतिहासिक भूमीत मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीचा गौरव वाढविण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
