बेळगाव : टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनगोळ, शिवशक्ती नगर येथे झालेल्या घरफोडी व चोरीच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून २ लाख ४९ हजार २६० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
अनगोळ येथील शिवशक्ती नगर परिसरातील एका घरात चोरी झाल्याची तक्रार टिळकवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ८१/२०२६, कलम ३०५ बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
खडेबाजार उपविभागाचे एसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पीआय यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी संशयितांचा माग काढत दोघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे तुषार मारुती करेनवर (वय २२), रा. इंदिरा नगर, अनगोळ, सध्या हिंदूनगर, टिळकवाडी आणि यल्लप्पा गजानन मुगळे (वय २८), रा. रघुनाथ पेठ, अनगोळ अशी आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून २,४९,२६० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, या चोरीच्या प्रकरणातील इतर बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या कारवाईत टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पीआय श्री. परशुराम पूजेरी, पीएसआय श्री. विश्वनाथ घंटामठ (का.सु.), तसेच अडिवेप्पा कुंडे (अवि.), महेश पाटील, एस.एम. करलिंगन्नवर, लाडजीसाब मुल्तानी, नागेंद्र तळवार, पी.एस. पवार, गंगा पार्वती, टेक्निकल सेलचे कर्मचारी रमेश अक्की आणि महादेव खाशी** यांच्यासह पोलिसांच्या पथकाने सहभाग घेतला.
पोलिस आयुक्त आणि डीसीपी यांनी या कामगिरीबद्दल तपास पथकाचे कौतुक केले आहे. चोरीच्या गुन्ह्याचा तपास पुढे सुरू आहे.
