बेळगाव : घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची यादी 5 जून रोजी जाहीर झाल्यानंतर, यादीतील प्रत्येक लाभार्थ्याची सखोल व पारदर्शक पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी फोर जेआर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनतर्फे करण्यात आली आहे.
संस्थेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लाभार्थी प्रत्यक्षात पात्र आहे की नाही याची खात्री करण्यासाठी संबंधित व्यक्ती सध्या ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे त्या परिसरातील शेजारी व नागरिकांचे लेखी मत घेण्यात यावे. स्थानिक नागरिकांनी संबंधित लाभार्थी 100 टक्के पात्र असल्याचे सादर केल्यानंतरच घरकुल योजनेतील घराचा ताबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच पिढ्यानपिढ्या भाड्याच्या घरात वास्तव्यास असलेली आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेली कुटुंबे यांनाच घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, असेही संस्थेने स्पष्ट केले आहे.
घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या कायदेशीर बाबी, मालमत्ता, उत्पन्न आणि अन्य कागदपत्रांची 100 टक्के काटेकोर चौकशी केल्यास अनेक अपात्र लाभार्थी समोर येतील व अनेक घरे रिकामी राहण्याची शक्यता असल्याचा दावा संस्थेने केला आहे.
दरम्यान, काही अत्यंत गरजू नागरिकांना योजनेसाठी आकारण्यात येणारी 60 हजार रुपयांची रक्कम भरणेही शक्य नसल्याचे निदर्शनास आणून देत, अशा गरीब नागरिकांसाठी नगरपालिका कोणती उपाययोजना करणार, असा सवालही संस्थेने उपस्थित केला आहे.
