बेळगाव : प्रतिनिधी
‘यात्री सेवा अभियान २०२६’ अंतर्गत बेळगाव विमानतळावर प्रवाशांच्या वैद्यकीय सुरक्षेसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विमानतळावर प्रवाशांना अचानक आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास तातडीने मदत मिळावी, यासाठी आवश्यक सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
विमानतळावर २४ तास रुग्णवाहिका आपत्कालीन सेवा, स्वतंत्र वैद्यकीय आपत्कालीन कक्ष तसेच प्रवाशांना तातडीची वैद्यकीय मदत देण्यासाठी डॉक्टर आणि परिचारिका उपलब्ध आहेत.
प्रवासादरम्यान प्रवाशांना कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास विमानतळावरील वैद्यकीय पथकाकडून तत्काळ प्राथमिक उपचार व आवश्यक मदत दिली जाणार आहे. या सुविधेमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आपत्कालीन वैद्यकीय गरज असलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
‘यात्री सेवा अभियान २०२६’च्या माध्यमातून प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी करण्यावर भर देण्यात येत आहे.
