त्वचादान म्हणजे मृत्यूनंतरही जीवनदान; अवयवदानाबाबत भारत अजूनही मागे – डॉ. राजेश पोवार

त्वचादान म्हणजे मृत्यूनंतरही जीवनदान; अवयवदानाबाबत भारत अजूनही मागे – डॉ. राजेश पोवार

जायंट्स मेनच्या वतीने ‘त्वचादान – गरज, महत्त्व आणि जनजागृती’ विषयावर व्याख्यान

बेळगाव : जळीत रुग्णांसाठी त्वचादान हे खऱ्या अर्थाने जीवनदान असून, अवयवदान आणि त्वचादानाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केएलई रोटरी स्किन बँकेचे संचालक व प्लास्टिक सर्जन डॉ. राजेश एस. पोवार यांनी केले.

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवनातील कै. तात्या पवार सभागृहात आयोजित ‘त्वचादान – गरज, महत्त्व आणि जनजागृती’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी जायंट्स मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, जायंट्स आय फाऊंडेशनचे अध्यक्ष मदन बामणे, फेडरेशनचे संचालक सुनील मुतगेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते डॉ. राजेश पोवार यांचा शाल, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. सागर काटकर, डॉ. मनोज एच. आर. आणि त्वचापेढी प्रमुख अश्विनी इंगळे यांचाही सन्मान करण्यात आला.

व्याख्यानात डॉ. पोवार यांनी भारतातील अवयवदानाची सद्यस्थिती मांडताना सांगितले की, देशात दरवर्षी सुमारे दोन लाख रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज असते; मात्र त्यापैकी पाच टक्क्यांपेक्षाही कमी रुग्णांना आवश्यक अवयव उपलब्ध होतात. भारतातील अवयवदानाचे प्रमाण विकसित देशांच्या तुलनेत अत्यंत कमी असून, या क्षेत्रात व्यापक जनजागृतीची नितांत गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.

त्वचा हा शरीरातील सर्वात मोठा अवयव असून गंभीर भाजलेल्या रुग्णांसाठी त्वचादान अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्वचादानामुळे संसर्गाचा धोका कमी होतो, उपचाराचा खर्च व रुग्णालयातील मुक्काम कमी होतो आणि रुग्णाच्या जगण्याची शक्यता वाढते, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारतात दरवर्षी सुमारे दहा लाख मध्यम ते गंभीर जळीत रुग्णांची नोंद होत असून त्यात महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. मृत्यूनंतर सहा तासांच्या आत त्वचा संकलित केली जाते. ही प्रक्रिया अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण होते आणि त्यामुळे शरीर विद्रूप होत नाही किंवा धार्मिक विधींमध्ये कोणताही अडथळा येत नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

त्वचादानासाठी पूर्वनोंदणी आवश्यक नसून मृत्यूनंतर नातेवाईकांच्या संमतीने त्वचादान करता येते. संकलित त्वचेवर वैज्ञानिक प्रक्रिया करून ती स्किन बँकेत सुरक्षित ठेवली जाते आणि गरजेनुसार जळीत रुग्णांवर प्रत्यारोपित केली जाते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जायंट्स आय फाऊंडेशनचे अध्यक्ष मदन बामणे यांनी त्वचादानाबाबत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देत भविष्यात शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि ग्रामीण भागात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमानंतर उपस्थितांनी त्वचादानासंदर्भातील विविध शंका उपस्थित केल्या. डॉ. राजेश पोवार यांनी शास्त्रीय पद्धतीने सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत उपस्थितांचे गैरसमज दूर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पुंडलिक पावशे यांनी केले. यावेळी जायंट्स मेनचे पदाधिकारी, जायंट्स आय फाऊंडेशनचे सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“मृत्यूनंतरही दुसऱ्याला नवजीवन देण्याची संधी प्रत्येकाला मिळू शकते. त्वचादान हा मानवतेचा सर्वोच्च संदेश असून समाजातील प्रत्येकाने या कार्यासाठी पुढाकार घ्यावा,” असा प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 + 18 =

error: Content is protected !!