बेळगाव : शहरातील Lenskart च्या विविध शाखांवर श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी भेट देत तेथील कामकाज व नियमांविषयी चौकशी केली. बिंदी, कलावा आणि टिळक यांना परवानगी नसल्याचे काही ठिकाणी सांगितले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी संबंधित व्यवस्थापनाकडे बिंदी, टिळक आणि कलावा यांना परवानगी का नाही, तसेच हिजाबला परवानगी का आहे, याबाबत स्पष्टीकरण मागितले. काही ठिकाणी जुन्या नियमांनुसार काम सुरू असल्याचे समजले असून, सुधारित नियम अद्याप पूर्णपणे लागू झाले नसल्याची माहिती देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
श्रीराम सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना आपली परंपरा आणि संस्कृती जपण्याचे आवाहन करत, टिळक, बिंदी आणि कलावा निर्भयपणे धारण करावेत, असे मत व्यक्त केले. पुढील काळात अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास आम्हाला कळवावे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेबाबत संबंधित कंपनीकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसून, शहरात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.
