शिवम असोसिएट्स घोटाळा : सनी लिओनीसह अनेक कलाकारांना पैशांचे व्यवहार; CID तपासात धक्कादायक माहिती उघड

शिवम असोसिएट्स घोटाळा : सनी लिओनीसह अनेक कलाकारांना पैशांचे व्यवहार; CID तपासात धक्कादायक माहिती उघड

बेळगाव : अधिक परताव्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवम असोसिएट्सचा मालक शिवानंद नीलण्णवर याच्याबाबत CID तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठेवीदारांकडून जमा झालेला पैसा अभिनेत्री हिच्यासह अनेक चित्रपट कलाकारांना दिल्याची माहिती CID चे डीआयजी भीमाशंकर गुलेद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बहुकोटी फसवणूक प्रकरणात शिवम असोसिएट्सविरोधात गुन्हा दाखल असून CID कडून सखोल तपास सुरू आहे. सामान्यतः तपास सुरू असताना पत्रकार परिषद घेतली जात नाही. मात्र या प्रकरणात अनेक अफवा आणि गैरसमज पसरत असल्याने वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आल्याचे डीआयजी गुलेद यांनी स्पष्ट केले.

सनी लिओनीला नोटीस देण्याची शक्यता

तपासादरम्यान शिवानंद नीलण्णवरने जमा झालेल्या पैशांमधून सनी लिओनीसह अनेक कलाकारांना पैसे दिल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित कलाकारांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याचे CID ने सांगितले.

अटकेनंतरही खात्यात पैसे जमा

नीलण्णवरला अटक झाल्यानंतरही अनेक लोक त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या खात्यांमध्ये पैसे जमा करत असल्याचे CID ने सांगितले. गेल्या 20 दिवसांत तब्बल 5 कोटी रुपयांहून अधिक रक्कम त्याच्या खात्यांमध्ये जमा झाल्याचे उघड झाले आहे. नागरिकांनी अधिक व्याजाच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

40 हजारांहून अधिक गुंतवणूकदार; ₹2400 कोटींची उलाढाल

CID च्या प्राथमिक तपासानुसार, शिवानंद नीलण्णवरने सुमारे 40,700 गुंतवणूकदारांकडून तब्बल ₹2400 कोटी जमा केले. नवीन गुंतवणूकदारांकडून आलेला पैसा जुन्या गुंतवणूकदारांना व्याज म्हणून देण्याची पद्धत वापरली जात होती.

2025 मध्ये ₹1000 ठेवणाऱ्यांना 2026 मध्ये मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवले जात होते. जोपर्यंत नवीन ठेवी येत होत्या, तोपर्यंत ही योजना सुरू होती, अशी माहिती CID ने दिली.

शेअर मार्केटमध्ये ₹170 कोटींचे नुकसान

सुमारे ₹540 कोटींची गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये करण्यात आली होती. त्यामध्ये जवळपास ₹170 कोटींचे नुकसान झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याशिवाय ₹390 कोटी विविध ठिकाणांहून परत मिळण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आलिशान गाड्या, मालमत्ता आणि सोने खरेदी

ठेवीदारांच्या पैशांतून नीलण्णवरने अनेक आलिशान गाड्या, मालमत्ता आणि सोन्याची खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे. दोन मर्सिडीज, डिफेंडर, वरना आणि 11 व्होल्वो XC90 गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. काही वाहने इतर राज्यांत नोंदणीकृत असल्याने संबंधित राज्यांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मागवण्यात आली आहे.

तसेच 250 ग्रॅम सोन्याचे दागिने, विविध मालमत्ता आणि कंपनीच्या पैशातून वैयक्तिक खात्यांमध्ये ₹55 कोटी वळवण्यात आल्याची माहिती CID ने दिली.

अधिक नफा घेतलेल्या गुंतवणूकदारांनाही नोटीस

CID ने आतापर्यंत 20 हजार गुंतवणूकदारांच्या कागदपत्रांची तपासणी केली असून त्यापैकी 10 हजार गुंतवणूकदार महाराष्ट्रातील असल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान नीलण्णवरच्या 30 बँक खात्यांचा शोध लागला असून त्यातील 7 खात्यांतून मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले आहेत. एका खात्याची व्यवहार नोंदच तब्बल 36,200 पानांची असल्याचे CID ने सांगितले.

याशिवाय, नियमबाह्यरीत्या अधिक नफा मिळवलेल्या गुंतवणूकदारांनाही नोटीस बजावून अतिरिक्त रक्कम वसूल केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × three =

error: Content is protected !!