टिळकवाडीत ज्येष्ठ डॉक्टरची गोळी झाडून आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

टिळकवाडीत ज्येष्ठ डॉक्टरची गोळी झाडून आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

बेळगाव : शहरातील टिळकवाडी परिसरात एका ज्येष्ठ डॉक्टरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे बेळगावच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मृत डॉक्टरांचे नाव डॉ. दिनेश लक्ष्मण भटकळ (वय ७९) असे असून ते मूळचे उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्याचे रहिवासी होते. गेल्या काही वर्षांपासून ते बेळगावात वास्तव्यास असून वैद्यकीय सेवा बजावत होते. सध्या ते केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये सेवा देत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे सहाच्या दरम्यान डॉ. भटकळ यांनी आपल्या घराच्या बाल्कनीत स्वतःवर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि परिसरातील रहिवासी घटनास्थळी धावून आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

काही दिवसांपूर्वी त्यांना कर्करोग झाल्याची माहिती मिळाली होती. आजारपण आणि मानसिक नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपासानंतर आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच टिळकवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून तपास सुरू केला.

बेळगावमध्ये स्थायिक होण्यापूर्वी डॉ. भटकळ यांनी अनेक वर्षे वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावली होती. शहरातील उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या अशा सुविद्य व्यक्तिमत्त्वाच्या आत्महत्येमुळे नागरिकांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × two =

error: Content is protected !!