बेळगाव, दि. ११ जुलै : आरपीडी पदवीपूर्व कला व वाणिज्य महाविद्यालय, बेळगाव येथे शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणारी आव्हाने, शाश्वत विकास आणि सामाजिक जबाबदारी याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी डॉ. प्रा. शर्मिला संभाजी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी वाढती लोकसंख्या, तिचे सामाजिक व आर्थिक परिणाम, आरोग्य व शिक्षण क्षेत्रावरील प्रभाव तसेच शाश्वत विकासासाठी लोकसंख्या नियंत्रणाचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने लोकसंख्येबाबत जागरूक राहून समाजात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. तृप्ती शिंदे या होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लोकसंख्या आणि विकास यांचा परस्परसंबंध स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत जनजागृतीच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मंजुनाथ दोड्डमने यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विद्यार्थिनी लक्ष्मी चंदर्गी हिने केले, तर रवी नार्वेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये लोकसंख्याविषयक जाणीव आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ झाली.
