आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालयात ‘तरंग’ महोत्सव उत्साहात; ९३७ विद्यार्थ्यांचा सहभाग

आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालयात ‘तरंग’ महोत्सव उत्साहात; ९३७ विद्यार्थ्यांचा सहभाग

जनरल चॅम्पियनचा मान भरतेश शाळेला; विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी दाखविले कौशल्य

बेळगाव : टिळकवाडी येथील आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘तरंग’ महोत्सवाची उत्साहात सांगता झाली. शालेय विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने आयोजित या महोत्सवात तब्बल ९३७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले कौशल्य सादर केले. या महोत्सवातील जनरल चॅम्पियनचा मान भरतेश शाळेने पटकावला.

महोत्सवात कबड्डी आणि व्हॉलीबॉलसह विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मुलींच्या कबड्डी स्पर्धेत बेळवटी हायस्कूलने प्रथम, तर बालिका आदर्श हायस्कूलने द्वितीय क्रमांक मिळविला. व्हॉलीबॉल स्पर्धेत बालिका आदर्श हायस्कूलने प्रथम, तर स्वाध्याय हायस्कूलने द्वितीय क्रमांक पटकाविला. मुलांच्या कबड्डी स्पर्धेत गोमटेश हायस्कूलने प्रथम, तर मराठा मंडळ हायस्कूलने द्वितीय क्रमांक मिळविला.

सांस्कृतिक स्पर्धांमध्ये छायाचित्रण, मुखचित्र, मास्टर अँड मिस, नृत्य तसेच फन गेम्स अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये भरतेश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे आणि विविध क्षेत्रांतील कौशल्यांना प्रोत्साहन देणे हा या दोन दिवसीय महोत्सवाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गोविंद वेलिंग, लता कित्तूर, डॉ. धनश्री आजगावकर उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या तृप्ती शिंदे यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रिचेल साळवी आणि प्रा. चार्मिन फर्नांडिस यांनी केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विविध स्पर्धांमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे ‘तरंग’ महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 + twenty =

error: Content is protected !!