जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे जागतिक विक्रमवीर अनुज बेळगावकर आणि राष्ट्रीय कबड्डी सुवर्णपदक विजेता अनिरुद्ध बेळगावकर यांचा गौरव

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे जागतिक विक्रमवीर अनुज बेळगावकर आणि राष्ट्रीय कबड्डी सुवर्णपदक विजेता अनिरुद्ध बेळगावकर यांचा गौरव

स्केटिंगमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद; राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत अतिवाड गावाचा नावलौकिक

बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने स्केटिंगमध्ये जागतिक विक्रमाची नोंद करणारा अनुज श्रीकांत बेळगावकर आणि राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारा अनिरुद्ध सतीश बेळगावकर या दोन्ही युवा खेळाडूंचा भव्य सत्कार करण्यात आला. बेळगाव येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या सभागृहात ११ नोव्हेंबर रोजी हा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.

अनुज बेळगावकर याने १०० मीटर बॅकवर्ड स्केटिंगचे अंतर १७.९३ सेकंदांत पूर्ण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. तर पुणे येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनिरुद्ध सतीश बेळगावकर याने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झालेल्या सीबीएसई १४ वर्षांखालील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सांघिक गटातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. या दोघांनीही अतिवाड गावासह बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष अॅड. लक्ष्मण शिंदे होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष मधु बेळगावकर, पदाधिकारी विश्वास पवार आणि संजय पाटील उपस्थित होते. पुंडलिक पावशे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्ष अॅड. लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी जागतिक विक्रमवीर अनुज आणि राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता अनिरुद्ध यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी अध्यक्ष अॅड. लक्ष्मण शिंदे यांनी जायंट्स संस्था सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी नेहमीच अग्रेसर असून विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य करत असल्याचे सांगितले. निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर, मधु बेळगावकर, विश्वास पवार आणि संजय पाटील यांनी दोन्ही खेळाडूंचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

खेळाडूंचे आजोबा तसेच बेकिनकेरे ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष मारुती बेळगावकर यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी खेळाडूंचे आजोबा मारुती बेळगावकर, वडील सतीश बेळगावकर, श्रीकांत बेळगावकर आणि आई संगीता बेळगावकर यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अतिवाड गावातील नातेवाईक कृष्णा धामणेकर, भरमा धामणेकर, पांडुरंग पाटील, बाळू तम्मानाचे यांच्यासह अनेक हितचिंतक उपस्थित होते. विजय बनसूर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × three =

error: Content is protected !!