स्केटिंगमधून खेळाडूंमध्ये जग जिंकण्याची ताकद : मान्यवरांचे प्रतिपादन
बेळगावातील विविध ठिकाणी जिल्हास्तरीय तसेच क्लब पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या रोलर स्केटिंग स्पर्धांचा बक्षीस समारंभ नुकताच शिवगंगा स्पोर्ट्स क्लब स्केटिंग रिंक येथे उत्साहात पार पडला.
या समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून शिवगंगा स्केटिंग क्लबच्या अध्यक्षा सौ. ज्योती चिंडक तसेच स्केट पार्कचे अध्यक्ष अशोक गोरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या सर्व स्पर्धकांना मेडल प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना सौ. ज्योती चिंडक यांनी स्केटिंग हा केवळ खेळ नसून आरोग्य, आत्मविश्वास आणि शिस्त घडवणारा उत्तम व्यासपीठ असल्याचे सांगितले. स्केटर्सनी सातत्याने मेहनत घेतल्यास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवता येते, असेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्ष अशोक गोरे यांनी बेळगावातील स्केटर्सना प्रोत्साहन देत, “खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू,” असे आश्वासन दिले.
स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांनी पालक आणि स्केटर्सना शिस्तबद्ध खेळ, मेहनत आणि खेळाडू म्हणून असलेली जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्केटिंगपटू निखिल चिंडक, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गंगणे, सोहम हिंडलगेकर, ऋषिकेश पसारे, श्री. रोकडे, मिसेस महात, कृष्ण कन्हैया होसमनी, विनायक पाटील तसेच बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्स आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून भविष्यात बेळगावातील स्केटर्स राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
