बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शुक्रवारी (ता.१५) सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाच्या (आरपीडी) घोटगे इमारतीतील मराठी विभागात हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या मेळाव्याची तयारी माजी विद्यार्थ्यांकडून पूर्ण करण्यात आली असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विभागप्रमुख व साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड असणार आहेत. तसेच विभागप्रमुख डॉ. मनिषा नेसरकर, डॉ. चंद्रकांत वाघमारे, डॉ. संजय कांबळे आणि डॉ. मैज्जोद्दीन मुतवल्ली यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी मराठी संघ तसेच माजी विद्यार्थी संघाची घोषणा करण्यात येणार असून मराठी विभागाच्या उत्कर्षासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत चर्चा होणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या मेळाव्याची तयारी सुरू असून आतापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मराठी विभागाच्यावतीने सर्व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
