बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ, बेळगाव यांच्या वतीने ऐतिहासिक राजहंसगड (येळ्ळूरगड) येथे भव्य गड चढणे–उतरणे स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला यंदाही मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार असून स्पर्धेची सुरुवात परमेश्वर नगर, इंदिरा कॉलनी, येळ्ळूर येथून होणार आहे.
या स्पर्धेत विविध वयोगटांतील स्पर्धक सहभागी होणार असून ८ वर्षांखालील, १२ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील मुला-मुलींसाठी स्वतंत्र गटांची रचना करण्यात आली आहे. प्रत्येक गटात मुला-मुलींसाठी स्वतंत्र बक्षीस व्यवस्था ठेवण्यात आली असून स्पर्धकांमध्ये चुरस वाढणार आहे. ८ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांकाला १००० रुपये, द्वितीय ८०० रुपये आणि तृतीय ५०० रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. १२ वर्षांखालील गटात प्रथम १५०० रुपये, द्वितीय १००० रुपये आणि तृतीय ५०० रुपये, तर १६ वर्षांखालील गटात प्रथम २००० रुपये, द्वितीय १५०० रुपये आणि तृतीय १००० रुपये अशी रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे खुल्या पुरुष आणि महिला गटातील विजेत्यांना दिला जाणारा मानाचा ‘गडाचा राजा’ आणि ‘गडाची राणी’ हा किताब ठरणार आहे. या खुल्या गटात प्रथम क्रमांकासाठी ३००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २००० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १००० रुपये रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे. याशिवाय सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी नोंदणी स्पर्धा स्थळीच, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी करण्यात येणार असून जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घेऊन या ऐतिहासिक राजहंसगडावर आपले कौशल्य, सहनशक्ती आणि धैर्य दाखवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अध्यक्ष अंकुश केसरकर (मो. 9739963229), स्पर्धा प्रमुख राजू ओऊळकर, संजय बाळेकुंद्री तसेच श्रीकांत कदम (मो. 9611756529) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.
