बेळगाव : शहरातील मारुती गल्ली परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अखेर महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार मोठी कारवाई करत भव्य इमारत पाडली. संबंधित इमारतीबाबत दीर्घकाळापासून वाद सुरू होता आणि विविध टप्प्यांवर नोटिसा, आदेश तसेच परवानगी रद्द करूनही बांधकाम सुरूच ठेवण्यात आले होते.
उपलब्ध माहितीनुसार, सीटीएस क्रमांक 1590/A1/A, 1590/A2, 1590/A3, 1590/A4, 1590/A5, 1590/A6, 1590/A7, 1590/A8, 1590/B2 आणि 1589 या जागांवर (बेसमेंट + जी + 2) तसेच (जी + 3) मजल्यांची मोठी इमारत उभारण्यात आली होती. सुरुवातीला निवासी बांधकामासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर चुकीची माहिती देऊन परवानगी मिळवल्याची तक्रार मोहम्मद शरीफ एम. मुल्ला यांनी महानगरपालिकेकडे दाखल केली.
तक्रारीनंतर महानगरपालिकेने संबंधितांना कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. मात्र, आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने तसेच बांधकाम नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने इमारतीचा परवाना रद्द करण्यात आला. यासोबतच बेळगाव शहरी विकास प्राधिकरणाकडूनही मंजुरी स्थगित करण्यात आली.
महानगरपालिकेने केएमसी अधिनियम 1976 च्या कलम 321 अंतर्गत कारणे दाखवा नोटीस आणि अंतरिम आदेश जारी केला होता. दिनांक 25 जून 2024 रोजीचा अंतरिम आदेश कायम ठेवत, संबंधित इमारत सात दिवसांत रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, संबंधित मालकाने आदेशाचे पालन न करता बांधकाम सुरूच ठेवले.
यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून अहवाल सादर केला. पाहणीदरम्यान संबंधित मालकाने अधिकृत अहवालावर सही करण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली. सर्व बाबींचा विचार करून अखेर केएमसी कायद्याअंतर्गत इमारत बेकायदेशीर ठरवत ती पाडण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला.
न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई राबवली. या वेळी महापालिकेचे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारवाईदरम्यान संपूर्ण इमारत जमीनदोस्त करण्यात आली.
दरम्यान, बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांवर अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महानगरपालिकेकडून देण्यात आला असून, नागरिकांनी बांधकाम करताना नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
