निपाणी : मराठी माध्यम शाळांतील विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण तसेच इतर विषयांची पाठ्यपुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी निपाणी येथील विविध सामाजिक, शैक्षणिक व मराठीप्रेमी संघटनांच्या प्रतिनिधींनी क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे केली.
याबाबत मा. क्षेत्र शिक्षणाधिकारी, क्षेत्र शिक्षण कार्यालय निपाणी यांना निवेदन सादर करण्यात आले. सध्या निपाणी परिसरातील मराठी माध्यम शाळांमध्ये मूल्यशिक्षण विषयाची पुस्तके प्रामुख्याने कन्नड भाषेत उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास समजून घेण्यात अडचणी निर्माण होत असल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेत अधिक प्रभावीपणे होत असल्याने मूल्यशिक्षणासारखा व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित विषय मराठी भाषेत शिकविणे आवश्यक असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार करून मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक विषयांची पाठ्यपुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी निपाणी तालुका शिक्षण अधिकारी मा. नाईक मॅडम यांच्याशी चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान प्रा. डॉ. अच्युत माने, विजयराव देसाई निपाणकर सरकार, शिवसेनेचे बाबासाहेब खांबे, निपाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर, तुकाराम कोळी सर, बाबासाहेब मगदूम, अशोक खांडेकर आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
