बेळगाव : शहरातील चन्नम्मा सर्कल परिसरात सोमवारी (दि. ८ जून २०२६) सकाळी सुमारे १०:५० वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन मुलगा कार चालवत असल्याचे निदर्शनास आणले. केए-26-एम-3409 क्रमांकाची कार चालवणाऱ्या मुलाला पोलिसांनी वाहनासह ताब्यात घेतले.
यानंतर संबंधित मुलाच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवून घेणे हा दंडनीय गुन्हा असल्याची समज देण्यात आली. मोटार वाहन कायद्यानुसार वाहन मालकाविरोधात कारवाई करण्यात आली असून न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी किंवा चारचाकी वाहन देऊ नयेत. वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता जपावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
