मराठी भाषिकांनी व्यवहार बंद ठेवून काळा दिन पाळण्याचे आवाहन
निपाणी : प्रतिनिधी
सीमाभागातील मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त रविवारी, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी निपाणी शहर व परिसरात बंद पाळण्याचे आवाहन निपाणी महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना व मराठी भाषिक कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या वेळी बहुसंख्य मराठी भाषिक असलेला सीमाभाग तत्कालीन म्हैसूर राज्यात (सध्याचे कर्नाटक) समाविष्ट करण्यात आला. या निर्णयाविरोधात सीमाभागातील मराठी भाषिक दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी लोकशाही मार्गाने काळा दिन पाळून आपला निषेध व्यक्त करतात.
यंदा रविवारी, १ नोव्हेंबर रोजी निपाणी शहर आणि परिसरातील नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार, व्यवसाय, दुकाने, हॉटेल्स, रिक्षा, वडाप वाहतूक तसेच अन्य छोटे-मोठे व्यवसाय बंद ठेवून काळ्या दिनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व नागरिकांनी एकजुटीने या बंदमध्ये सहभागी होऊन शांततेच्या मार्गाने आपला निषेध नोंदवावा आणि मराठी भाषिकांची अस्मिता जपण्यासाठी आपली एकजूट दाखवावी, असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
नुकताच कर्नाटक उच्च न्यायालयाने काळा दिन लोकशाही मार्गाने पाळणे हा मराठी भाषिकांचा हक्क असल्याचा निर्वाळा दिल्याचा उल्लेखही पत्रकात करण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांनी एकजुटीने बंद पाळून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपली भूमिका ठामपणे मांडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
“यादिवशी मराठी भाषिकांनी एकजुटीने बंद पाळणे म्हणजे सीमाप्रश्न सोडवणुकीची नांदी ठरणार आहे,” असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
हे आवाहन निपाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर तसेच निपाणी तालुक्यातील बहुसंख्य मराठी भाषिक, शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
