बेळगाव : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांतील नाथपंथी रावळ समाजाला एकत्र आणत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा निर्धार व्यक्त करणारे पहिले एकदिवसीय अधिवेशन रविवारी शहापूर येथील श्री काळभैरवनाथ मंदिराच्या वतीने उत्साहात पार पडले. विविध राज्यांतून मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या समाजबांधवांनी संघटन, सामाजिक ऐक्य आणि विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण निर्णय घेत समाजाच्या भविष्यासाठी नवी दिशा निश्चित केली.
नाथ पै चौक, शहापूर-खडेबाजार येथील श्री अंबाबाई मंदिरात आयोजित अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी परशुराम चव्हाण होते. व्यासपीठावर कल्लाप्पा रावळ, विजय नाईक, हनुमंत हणगी (हुबळी), बी. नागराज (बेंगळुरू), कुमार रावळ (मिरज), प्रमोद रावळ (इचलकरंजी), एम. थोटप्पा (शिवमोगा), तवनाप्पा रावळ (बनहट्टी), सोमनाथ गंधवाले (युवा अध्यक्ष), शिवराम जोगी (मुर्डेश्वर), सिद्धाप्पा बावली, मंजुनाथ हाणगी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री काळभैरवनाथ मंदिराचे देणगीदार, समाजातील ज्येष्ठ नागरिक तसेच मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा शाल, पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. माजी आमदार संजय पाटील, शहापूर पोलीस ठाण्याचे सीपीआय सीमानी तसेच प्रसिद्ध कर सल्लागार संदीप खन्नुकर यांनी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहून समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या.
अधिवेशनात समाजासमोरील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाथपंथी रावळ समाज विविध जाती-समुदायांत विखुरलेला असल्याने समाजाने एकच जात नोंदविल्यास सामाजिक संघटन अधिक मजबूत होईल, तसेच शासकीय योजना आणि आरक्षणासह विविध शासकीय सुविधांचा लाभ मिळविणे अधिक सुलभ होईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
याशिवाय कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या बेळगावची समाजाच्या संपर्क केंद्रबिंदू शहर म्हणून निवड करण्यात आली. समाजातील विचारांचे आदानप्रदान, सामाजिक प्रश्नांवर चर्चा आणि विकासात्मक उपक्रमांना चालना देण्यासाठी दरवर्षी तिन्ही राज्यांपैकी एका राज्यात अधिवेशन आयोजित करण्यावरही सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष तथा माजी महापौर महेश नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ट्रस्ट कमिटीचे सचिव विजय नाईक यांनी आभार मानले, तर मंजुनाथ चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
तीन राज्यांतील समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे पहिले अधिवेशन ऐतिहासिक ठरले असून, नाथपंथी रावळ समाजाच्या संघटनात्मक बळकटीसह सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून या अधिवेशनाकडे पाहिले जात आहे.
