बेळगाव : बेळगावसह कर्नाटकातील मराठी भाषिक अल्पसंख्याक भागांमध्ये सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेसाठी वापरले जाणारे फॉर्म मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पाठविलेल्या पत्रात सावंत यांनी नमूद केले आहे की, बेळगाव जिल्ह्यासह सीमाभागातील मोठ्या प्रमाणावर नागरिक केवळ मराठी भाषा वाचतात, लिहितात आणि बोलतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामीण भागातील मतदारांना कन्नड भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्याने सध्या उपलब्ध असलेले कन्नडमधील SIR फॉर्म भरण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
पत्रात त्यांनी 1995 मधील कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख करत भाषिक अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे नमूद केले आहे. तसेच भारतीय राज्यघटनेतील भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांबाबतच्या तरतुदींचाही संदर्भ देत निवडणूक प्रक्रिया सर्वसमावेशक आणि भेदभावमुक्त असावी, असे त्यांनी म्हटले आहे.
खासदार सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे पुढील मागण्या केल्या आहेत:
- बेळगाव व कर्नाटकातील मराठी भाषिक भागांमध्ये SIR फॉर्म मराठीत उपलब्ध करावेत.
- मराठीत भरलेले अर्ज स्वीकारावेत.
- संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना मराठी फॉर्मचे वितरण व स्वीकार करण्याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात.
- SIR प्रक्रियेदरम्यान मराठी भाषेत आवश्यक मतदार सहाय्य उपलब्ध करून द्यावे.
मराठी भाषेत फॉर्म उपलब्ध झाल्यास मतदारांना होणारा त्रास कमी होईल, मतदारांचा सहभाग वाढेल आणि निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व सर्वसमावेशक होईल, असा विश्वासही त्यांनी पत्रात व्यक्त केला आहे.
