सीमाभागातील मराठी जनतेच्या समर्थनार्थ पुण्यात १ नोव्हेंबरला लाक्षणिक धरणे आंदोलन

सीमाभागातील मराठी जनतेच्या समर्थनार्थ पुण्यात १ नोव्हेंबरला लाक्षणिक धरणे आंदोलन

पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कांच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या वतीने रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हे आंदोलन होणार असून, पुणे शहरातील सर्व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत बेळगाव, निपाणी, कारवार, सुपा, हल्याळ, खानापूर, बिदर, भालकी, संतपूर आणि औराद यांसह मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकात समाविष्ट करण्यात आल्याने सीमाभागातील मराठी जनतेवर अन्याय झाल्याची भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीने मांडली आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या सात दशकांपासून सीमाभागातील मराठी जनता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली विविध लोकशाही मार्गांनी लढा देत आहे.

महाराष्ट्र सरकारने २९ मार्च २००४ रोजी सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी दावा दाखल केला असून, या खटल्याकडे सीमाभागातील मराठी जनतेचे लक्ष लागले आहे. न्यायालयीन लढ्याबरोबरच रस्त्यावरील लोकशाही आंदोलनही सुरू ठेवण्याची गरज असल्याचे समितीने आवाहनात नमूद केले आहे.

तसेच, २०१३ मध्ये भाषिक अल्पसंख्याकांच्या अधिकारांसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेत सीमाभागात मराठी भाषेतून शासकीय परिपत्रके देण्याच्या मागणीला न्यायालयीन यश मिळूनही राज्य सरकारकडून त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप समितीने केला आहे.

दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव साजरा केला जात असताना सीमाभागातील मराठी जनता हा दिवस काळा दिन म्हणून पाळते. या आंदोलनाला महाराष्ट्रातील जनतेनेही पाठिंबा द्यावा आणि सीमाभागातील मराठी बांधवांच्या भाषिक हक्कांच्या लढ्यात आपण सोबत असल्याचा संदेश द्यावा, या उद्देशाने पुण्यात हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

आंदोलनाचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे
दिनांक : रविवार, १ नोव्हेंबर २०२६
वेळ : सकाळी १० ते दुपारी १

या आंदोलनात सर्व मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती, पुणे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three + seventeen =

error: Content is protected !!