अथणी : तालुक्यातील एका धक्कादायक घटनेत 35 वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला असून, हुंड्यासाठी होत असलेल्या छळामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत महिलेची ओळख संगीता गाडीवड्डर अशी असून, तिचा विवाह सुमारे 15 वर्षांपूर्वी वेंकटेश यांच्याशी झाला होता. सुरुवातीला वैवाहिक आयुष्य सुरळीत असले तरी कालांतराने पतीकडून आर्थिक मागण्यांमुळे वाद वाढत गेले, अशी माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन घर बांधण्यासाठी माहेरहून ₹2 लाख आणण्याचा तगादा पतीकडून लावला जात होता. या मागणीवरून वारंवार वाद होत होते, ज्यामुळे संगिता यांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
मंगळवारी रात्री या कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्यानंतर बुधवारी घरात कोणी नसताना संगिता यांनी गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तपास सुरू आहे.
दरम्यान, संगिता यांच्या आई कस्तुरी यांनी आत्महत्येचा दावा फेटाळून लावत गंभीर आरोप केले आहेत. “माझी मुलगी असे पाऊल उचलणार नाही. पैशासाठी तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला,” असा आरोप करत त्यांनी सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे.
घटनेनंतर अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. अथणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
