अनगोळ शिवारात हलगा–मच्छे बायपासवरून तणाव; शेतकरी आक्रमक, कामावरून वाद चिघळला

अनगोळ शिवारात हलगा–मच्छे बायपासवरून तणाव; शेतकरी आक्रमक, कामावरून वाद चिघळला

बेळगाव (प्रतिनिधी) : वर्क ऑर्डर न देता अनगोळ शिवारात हलगा–मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने शुक्रवारी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करूनही काम थांबवण्यात न आल्याने अखेर त्यांनी कामासाठी आणलेल्या वाहनांच्या काचा फोडत आपला रोष व्यक्त केला. या घटनेदरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापटही झाल्याचे पाहायला मिळाले.

बायपास रस्त्याच्या झिरो पॉईंट निश्चितीच्या मुद्द्यावर काही शेतकरी न्यायालयात गेले असून, या प्रकरणाचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हे काम थांबवण्यात आले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर दिल्यानंतरच काम सुरू करू, असे आश्वासन दिले होते.

मात्र, शुक्रवारी सकाळी पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी अधिकाऱ्यांकडे वर्क ऑर्डरची मागणी केली असता, “आपले म्हणणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडा,” असे सांगत पोलिसांनी मध्यस्थी करत वेळकाढूपणा केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

मागील तीन वर्षांत शंभरहून अधिक वेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली तरी न्याय मिळाला नाही, अशी भावना व्यक्त करत संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद करण्याची ठाम मागणी केली. अखेर दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी खडीकरणासाठी आणलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून काही काळासाठी काम थांबवण्यास सांगितले.

तथापि, सायंकाळी सहानंतर पुन्हा काम सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी अधिकच वाढली आहे. या आंदोलनात अनिल अनगोळकर, सुभाष चौगुले, गोपाळ सोमनाचे, हनुमंत बाळेकुंद्री, गुंडू भागनाचे, महेश चतुर, भैरू कंग्राळकर, नितीन पैलवानाचे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen + 16 =

error: Content is protected !!