बेळगाव : देशाच्या सीमेवर ऊन, वारा, पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता मातृभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे रक्षाबंधनानिमित्त ‘पहिली राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत बालवाडीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने सुंदर राख्या तयार केल्या. या राख्यांवर सैनिक बांधवांना समर्पित विविध भावनिक संदेश लिहून विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या हाताने तयार केलेली राखी देशरक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या मनगटावर बांधली जाणार, या भावनेने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
राखीच्या धाग्यातून सैनिकांप्रति असलेला आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाचे संस्कार रुजविणारा ठरला. ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत… तुम्ही देशाचे रक्षण करता, म्हणून आम्ही निर्धास्त आहोत!’ हा भाव विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रत्येक राखीतून व्यक्त झाला.
सैनिकांच्या मनगटावर बांधली जाणारी ही राखी केवळ एक धागा नसून, देशाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या वीर जवानांसाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पाठविलेली प्रेम, कृतज्ञता आणि सुरक्षिततेची भावना आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचा खरा अर्थ समजण्याबरोबरच सैनिकांप्रती आदर आणि देशप्रेमाची भावना अधिक दृढ झाली.
‘आधार सोशल ट्रस्ट, पुणे’ यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या राजस्थानमधील बिकानेर येथे तैनात असलेल्या जवानांना पाठविण्यात आल्या.
या उपक्रमासाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक नारायण उडकेकर, संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, शिक्षक, विद्यार्थी तसेच स्नेहल पोटे आणि मुक्ता आलगोंडी यांनी विशेष परिश्रम घेतले.
