मराठी विद्यानिकेतनमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

मराठी विद्यानिकेतनमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

बेळगाव : प्रतिनिधी

येथील मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेतील संगणक शिक्षिका पद्मजा कुऱ्याळकर आणि अटल लॅबच्या शिक्षिका स्नेहा कुप्पेकर उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संगीत विभागाचे शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांच्या साथीने शिक्षकांनी ‘वैष्णव जन तो’ हे भजन सादर केले.

यावेळी पद्मजा कुऱ्याळकर यांनी महात्मा गांधी यांच्या कार्याचा आढावा घेतला. गांधीजींनी ‘चले जाव’, ‘असहकार आंदोलन’ आणि ‘दांडी यात्रा’ यांसारख्या आंदोलनांच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. ते केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते, तर समाजसुधारकही होते. स्वच्छता, स्वावलंबन, खादीचा वापर आणि अस्पृश्यता निवारण यांसारख्या विषयांवर त्यांनी आयुष्यभर भर दिला. तसेच स्वच्छता आणि शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले, असे त्यांनी सांगितले.

तर स्नेहा कुप्पेकर यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. शास्त्रीजींचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे झाला. अत्यंत साधे जीवन आणि उच्च विचारसरणी असलेले शास्त्रीजी प्रामाणिक, देशभक्त आणि खंबीर नेतृत्वाचे प्रतीक होते, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी शाळेच्या विविध परिसरांची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला.

यावेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षण संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × four =

error: Content is protected !!