चिनी मांजाने घेतला आणखी एक बळी; गांधीनगर उड्डाणपुलावर मोटारसायकलस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

चिनी मांजाने घेतला आणखी एक बळी; गांधीनगर उड्डाणपुलावर मोटारसायकलस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बेळगाव : प्रतिनिधी

पतंग पकडताना एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता चिनी मांजामुळे आणखी एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गांधीनगर उड्डाणपुलावर गुरुवारी (१ ऑक्टोबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. मोटारसायकलवरून जात असताना गळ्यात पतंगाचा मांजा अडकून गळा चिरल्याने तरुणाचा मृत्यू झाला. संतोष करजुंगी (वय १९, रा. महंतेश नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष हा गुरुवारी सायंकाळी आपल्या मोटारसायकलवरून गांधीनगर उड्डाणपुलावरून जात होता. यावेळी अचानक पतंगाचा मांजा त्याच्या गळ्यात अडकला. मांजामुळे त्याचा गळा गंभीररीत्या चिरला गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याची मोटारसायकल महामार्गाशेजारील रेलिंगला जाऊन टेकली.

घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असावा, असा समज झाल्याने वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, तपासादरम्यान मांजामुळे गळा चिरल्याने मृत्यू झाल्याचे लक्षात येताच माळमारुती पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

बेळगाव शहरात जीवघेण्या मांजाच्या विक्रीवर बंदी असतानाही पतंग उडवण्यासाठी चिनी मांजाचा वापर होत असल्याचे या घटनेवरून पुन्हा समोर आले आहे. निष्पाप नागरिकांच्या जीवावर बेतणाऱ्या या जीवघेण्या मांजाच्या वापरावर आणि विक्रीवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पतंग उडवण्याच्या आनंदासाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणे कितपत योग्य? चिनी मांजाच्या विळख्यात आणखी किती जणांचे जीव जाणार, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 + 1 =

error: Content is protected !!