बेळगाव : शिक्षण घेऊन केवळ यंत्रवत जीवन जगण्यापेक्षा मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करा. ध्येयावर ठाम राहिल्यास यश निश्चित मिळते, असे प्रेरणादायी प्रतिपादन डॉ. उमेश कळेकर यांनी केले.
मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वतीने मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा मराठा मंदिर येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते. व्यासपीठावर गोव्याचे माजी आमदार नरेश सावळ, कार्याध्यक्ष शिवराज पाटील, देणगीदार विजय कंग्राळकर, महेश हलगेकर, उमेश पाटील, दीपक किल्लेकर तसेच खजिनदार के. एल. मजूकर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. कळेकर म्हणाले की, आई-वडील ज्या क्षेत्रात आहेत तेच क्षेत्र निवडण्यापेक्षा स्वतःमधील सुप्त गुण ओळखून आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे. शरीर, मन आणि वाचा जागृत ठेवली तरच जीवनाला योग्य दिशा मिळते. बुद्धिमत्ता महत्त्वाची असली तरी मनावर नियंत्रण ठेवणे त्याहून अधिक आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार नरेश सावळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजहंसाप्रमाणे चांगले-वाईट ओळखण्याची क्षमता विकसित करण्याचे आवाहन केले. केवळ नावलौकिकासाठी नव्हे, तर चांगला माणूस बनणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडिया आणि मोबाईल ही दुधारी शस्त्रे असून त्यांचा योग्य वापर व्हावा यासाठी पालकांनीही मुलांवर लक्ष ठेवणे ही त्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी दहावीतील साईशा देसाई, मुग्धा गोडसे, स्नेहा हिरोजी, प्राजक्ता चौगुले, साईश देसाई, अनिकेत जाधव, पल्लवी पाटील, वैभवी कुगजी, प्रणिती संभाजी, उर्वी वांगीकर तसेच बारावीतील तनिष्का नावगेकर, रिया राऊत, साक्षी देसाई, श्रद्धा ढवळे, विनीत मोटरे, समृद्धी पाटील, साईराज पाटील, तनिष्का लगाडे, विनंती रेडेकर आणि समीक्षा मनगुतकर यांचा सत्कार करण्यात आला.
याशिवाय दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम आलेली दिव्या देसाई, ९९.३३ टक्के गुणांसह राज्यात पाचवा क्रमांक मिळवलेली अनुष्का देसाई तसेच ९८.७२ टक्के गुण मिळवून मराठी माध्यमातून राज्यात प्रथम आलेली खानापूर तालुक्यातील जान्हवी पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
समारंभात दहावी व बारावी परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या तब्बल २१७ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन नरेश सावळ यांच्या हस्ते, तर महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन डॉ. उमेश कळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्याध्यक्ष शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांची ओळख करून दिली. खजिनदार के. एल. मजूकर यांनी सूत्रसंचालन केले. सहचिटणीस संग्राम गोडसे यांनी स्वागत केले, तर ईश्वर लगाडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजू पावले, प्रकाश गडकरी, कविता देसाई, दत्तात्रय जाधव, सुरेंद्र जाधव, विनोद आंबेवाडकर, प्रदीप चव्हाण, शेखर पाटील, सुहास हुद्दार आणि उमेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास पालक, विद्यार्थी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
