मतदानासाठी होणारी गैरसोय व ग्रामपंचायतीतील प्रतिनिधित्वाचा प्रश्न उपस्थित; तातडीने कार्यवाहीची अपेक्षा:
खानापूर (प्रतिनिधी): खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी येथील ग्रामस्थांनी गावासाठी स्वतंत्र मतदान बूथ तसेच कसबा नंदगड ग्रामपंचायतीत स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्याची मागणी करत मतदार नोंदणी अधिकारी बलराम चव्हाण आणि खानापूरचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांना निवेदन सादर केले.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी चन्नेवाडी व भुत्तेवाडी येथील मतदारांसाठी चन्नेवाडीच्या प्राथमिक शाळेत मतदान केंद्र होते. मात्र, मतदारसंख्येच्या आधारे हे मतदान केंद्र नंतर भुत्तेवाडी येथे हलविण्यात आले. त्यामुळे चन्नेवाडीतील मतदारांना मतदानासाठी अधिक अंतराचा प्रवास करावा लागत असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांची मोठी गैरसोय होत आहे. काही मतदार मतदानापासून वंचित राहण्याचीही शक्यता असल्याने चन्नेवाडीच्या प्राथमिक शाळेत पुन्हा स्वतंत्र मतदान बूथ सुरू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, कसबा नंदगड ग्रामपंचायतीत चन्नेवाडी व भुत्तेवाडी या दोन्ही गावांचा एकच वॉर्ड असून त्यातून तीन सदस्य निवडले जातात. भुत्तेवाडीची मतदारसंख्या चन्नेवाडीपेक्षा दुप्पट असल्याने चन्नेवाडीला ग्रामपंचायतीत प्रभावी प्रतिनिधित्व मिळत नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. याचा गावाच्या विकासकामांवरही विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून, चन्नेवाडीसाठी स्वतंत्र वॉर्ड निर्माण करून गावाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्वतंत्र मतदान बूथ व स्वतंत्र वॉर्ड निर्मितीसाठी आवश्यक ती तातडीची कार्यवाही करावी, अशी विनंती ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
या निवेदनावर शामराव क. पाटील, धनंजय रा. पाटील, रणजीत शा. पाटील, परशराम मा. ऱ्हाटोळकर, मुरलीधर पु. पाटील, रामचंद्र स. ऱ्हाटोळकर, भरमाजी वि. पाटील, महादेव सी. ऱ्हाटोळकर, सुहास क. पाटील, श्रीनाथ वि. पाटील, नागेश व. पाटील, प्रशांत क. पाटील, लक्ष्मण वि. पाटील, विष्णू ल. पाटील, विठ्ठल पु. पाटील, नागोजी क. पाटील, सुधाकर वि. पाटील, सदानंद रा. पाटील, घुराप्पा सु. पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून, निवेदन सादर करताना संबंधित ग्रामस्थ उपस्थित होते.
