मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र सरकारने बोलावलेली सर्वपक्षीय उच्चस्तरीय बैठक मंगळवारी विधान भवनात पार पडली. बैठकीत सीमा प्रश्नावर पुढील कायदेशीर आणि राजकीय भूमिका ठरविण्यात आली.
बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सीमा प्रश्नावर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि सीमावासीयांना न्याय मिळावा, यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील राहणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
तसेच महाराष्ट्र सरकार सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, सर्वोच्च न्यायालयातील लढा अधिक प्रभावी आणि तीव्रपणे लढण्याचा निर्णयही घेण्यात आला. यासाठी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारतर्फे वरिष्ठ वकिलांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बैठकीत सीमा भागातील परिस्थिती, कर्नाटक सरकारच्या हालचाली तसेच पुढील कायदेशीर रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली. सीमावासीयांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याबाबत बैठकीत एकमत व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, सीमा प्रश्नावर कर्नाटक सरकारच्या भूमिकेला “जशास तसे” उत्तर देण्याचा ठरावही बैठकीत एकमताने करण्यात आला. याबाबतची अधिकृत माहिती सरकारकडून लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
