कन्नडमधील ‘एसआयआर’ फॉर्म्सच्या अडचणी सोडवण्यासाठी म. ए. समितीकडून रोज दोन तास मदत केंद्र

कन्नडमधील ‘एसआयआर’ फॉर्म्सच्या अडचणी सोडवण्यासाठी म. ए. समितीकडून रोज दोन तास मदत केंद्र

बेळगाव : प्रतिनिधी

सध्या सुरू असलेल्या ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेसाठी वितरित करण्यात येणारे फॉर्म्स कन्नड भाषेत असल्यामुळे मराठी भाषिक मतदारांना ते भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीने वडगाव येथे विशेष मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून दररोज संध्याकाळी दोन तास मतदारांना फॉर्म भरणे व संबंधित प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यासंदर्भात वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिर, राजवाडा कंपाऊंड येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, माजी नगरसेवक सुरेश रेडेकर आणि माजी नगरसेविका वर्षा आजरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत मराठी भाषिक मतदारांना ‘एसआयआर’ फॉर्म्स भरताना येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर ज्ञानेश्वर मंदिर येथे दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित राहून नागरिकांना फॉर्म भरणे, आवश्यक माहिती समजावून सांगणे तसेच प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

समितीच्या या उपक्रमामुळे मराठी भाषिक मतदारांना मोठा दिलासा मिळणार असून, कोणत्याही अडचणीशिवाय ‘एसआयआर’ प्रक्रिया पूर्ण करता येईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

या बैठकीला युवा कार्यकर्ते सागर पाटील, सुनील बोकडे, विठ्ठल पोळ, माजी नगरसेविका वर्षा आजरेकर, कीर्तीकुमार कुलकर्णी, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, माजी नगरसेवक सुरेश रेडेकर, ज्ञानेश्वर मुन्नूर, भाऊराव पाटील, महादेव पाटील यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील मराठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 + ten =

error: Content is protected !!