राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील रस्ता बंदबाबत खुलासा करण्याची मागणी

राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील रस्ता बंदबाबत खुलासा करण्याची मागणी

कोगनोळी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ च्या सहापदरीकरणाचे काम सुरू असून, कोगनोळी टोलनाक्यापासून तवंदी घाटापर्यंत विविध ठिकाणी उड्डाणपूल व इतर कामे सुरू आहेत. मात्र, काही ठिकाणी रस्ता दीर्घकाळ बंद ठेवण्यात आल्याने वाहनचालकांना होत असलेल्या त्रासाबाबत फोर जेआर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनच्या वतीने संबंधित कंत्राटदाराकडे खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य दरवाजासमोर राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या पुलावरून सहापदरी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरू असतानाच, संरक्षण भिंतीकडील तिसऱ्या टप्प्यातील रस्ता मुख्य पुलापासून दोन्ही बाजूंना मिळून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर दोन महिन्यांहून अधिक काळ बंद ठेवण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे. हा रस्ता नेमका कोणत्या कारणासाठी बंद करण्यात आला आहे, याबाबत स्पष्टता देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याचबरोबर आडी आणि आप्पाचीवाडी या दोन प्रमुख गावांना जोडणाऱ्या ठिकाणी उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण होऊन बरेच महिने झाले असतानाही दररोज हजारो लहान-मोठी तसेच अवजड वाहने सर्व्हिस रोडवरून ये-जा करीत आहेत. या ठिकाणी संरक्षण भिंतीचे कामही संथ गतीने सुरू असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

या सर्व बाबींमुळे वाहनचालकांना तसेच स्थानिक नागरिकांना होत असलेल्या अडचणींची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्गाचे काम करणारे कंत्राटदार एस. एम. औताडे प्रायव्हेट लिमिटेड यांनी वर्तमानपत्रे व न्यूज चॅनेलच्या माध्यमातून रस्ता बंद ठेवण्याचे कारण आणि कामाची सद्यस्थिती याबाबत स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी फोर जेआर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

फोर जेआर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन
C.I.N. U85300KA2022NPL164010

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × four =

error: Content is protected !!