हलगा गणेश विसर्जन मिरवणुकीतील विलंबाचे सत्य आले उजेडात; दुसऱ्या मंडळाच्या मूर्तीसाठी कार्यकर्त्यांनी फोडले घराचे सज्जे!

हलगा गणेश विसर्जन मिरवणुकीतील विलंबाचे सत्य आले उजेडात; दुसऱ्या मंडळाच्या मूर्तीसाठी कार्यकर्त्यांनी फोडले घराचे सज्जे!

शिवनेरी चौक मरगाई गल्ली गणेशोत्सव मंडळाच्या युवकांचा प्रगल्भ निर्णय; तालुक्यातून होत आहे कौतुक

बेधडक बेळगाव वृत्तसेवा | बेळगाव

बेळगाव तालुक्यातील हलगा गावातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या विलंबाचे सत्य आता उजेडात आले आहे. दुसऱ्या मंडळाच्या गणेशमूर्तीला मार्ग मिळावा यासाठी शिवनेरी चौक मरगाई गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या घरांचे सज्जे फोडून वाट करून दिली. कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या या समंजसपणाचे आणि सामाजिक बांधिलकीचे तालुकाभरातून कौतुक होत आहे.

हलगा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शिवनेरी चौक मरगाई गल्लीचा गणेशोत्सव मंडप दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याच आकारात उभारण्यात आला होता. गावातील मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणेशमूर्तीच्या मंडपाच्या बाजूने यापूर्वी इतर मंडळांच्या मूर्ती व्यवस्थित मार्गक्रमण करत होत्या. मात्र, रविवार सकाळी आणखी एका मंडळाची गणेशमूर्ती उपलब्ध जागेतून पुढे नेण्यात अडचण निर्माण झाली.

शिवनेरी चौकातील मंडळाचा मंडप यंदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिक मजबूत पद्धतीने उभारण्यात आला होता. हेवी मटेरियलचा वापर तसेच इंटरलॉक पद्धतीने मंडपाची उभारणी करण्यात आल्यामुळे तो तातडीने हटवणे शक्य नव्हते. यासंदर्भात ग्रामपंचायतीला पूर्वकल्पना देण्यात आल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, गणेशमूर्तीला मार्ग मिळत नसल्याने विसर्जन मिरवणुकीत काही काळ विलंब झाला. मात्र, या परिस्थितीत वाद किंवा तणाव निर्माण होऊ न देता शिवनेरी चौकातील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रगल्भ निर्णय घेतला. दुसऱ्या मंडळाच्या गणेशमूर्तीला मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरांचे सज्जे फोडण्याचा निर्णय घेतला आणि मूर्तीच्या मार्गातील अडथळा दूर केला.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून परस्पर सहकार्य, एकोपा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा उत्सव असल्याचे या युवकांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. स्वतःच्या मालमत्तेचे नुकसान सहन करून दुसऱ्या मंडळाच्या गणेशमूर्तीला मार्ग करून देणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बेधडक बेळगावमधून यापूर्वी गणेशमूर्ती अडकल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर शिवनेरी चौक मरगाई गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाने संपूर्ण परिस्थिती स्पष्ट करत विलंबामागील कारणे आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका समोर आणली आहे.

हलग्याचा मानबिंदू म्हणून ओळखले जाणारे शिवनेरी चौक मरगाई गल्ली येथील गणेशोत्सव मंडळ हे एक नावाजलेले मंडळ असून अनेक स्तुत्य उपक्रम राबविण्याची मंडळाची परंपरा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौक, तरुण युवक मंडळ ,शिवशक्ती युवक मंडळ ,गणपती गल्ली युवक मंडळ ,पाटील गल्ली युवक मंडळ, विजयनगर युवक मंडळ, भावकाई देवी युवक मंडळ आदी मंडळांनी देखील सहकार्य केल्याने सर्व सुरळीत पार पडले.

स्वतःच्या घराचे सज्जे फोडून दुसऱ्या गणरायाला मार्ग करून देणाऱ्या शिवनेरी चौकातील युवकांनी गणेशोत्सवातील खऱ्या एकोप्याचे दर्शन घडविले आहे. त्यांच्या या स्तुत्य कार्याची हलगा गावासह संपूर्ण बेळगाव तालुक्यात चर्चा सुरू आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 2 =

error: Content is protected !!