कर्तव्य, शौर्य आणि प्रेरणेचा अखंड दीप मालवलालेफ्टनंट जनरल विजय ओबेरॉय यांचे निधन

कर्तव्य, शौर्य आणि प्रेरणेचा अखंड दीप मालवलालेफ्टनंट जनरल विजय ओबेरॉय यांचे निधन

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे माजी उपसेनाप्रमुख लेफ्टनंट जनरल विजय ओबेरॉय (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम) यांचे रविवारी १४ जून २०२६ रोजी चंदीगड येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय लष्कराने एक धाडसी योद्धा, दूरदृष्टी असलेला रणनीतीकार आणि सैनिकांच्या हक्कांसाठी अखंड लढणारा नेता गमावला आहे.

२९ सप्टेंबर १९४१ रोजी जन्मलेल्या विजय ओबेरॉय यांची जून १९६१ मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये नियुक्ती झाली होती. “कर्तव्य, सन्मान आणि शौर्य” हे रेजिमेंटचे ब्रीद त्यांनी आयुष्यभर जपले. १९६५ च्या भारत-पाक युद्धादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये सेवेत असताना ते गंभीर जखमी झाले आणि त्यांनी आपला उजवा पाय गमावला. मात्र या अपंगत्वाने त्यांचे मनोधैर्य कधीच खचवले नाही. कृत्रिम पायाच्या सहाय्याने त्यांनी तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ देशसेवा सुरू ठेवली.

सेवेच्या काळात त्यांनी डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स, आर्मी ट्रेनिंग कमांड (ARTRAC) चे प्रमुख, वेस्टर्न कमांडचे आर्मी कमांडर अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. ३० सप्टेंबर २००१ रोजी ते भारतीय लष्कराचे उपसेनाप्रमुख पदावरून निवृत्त झाले. अमेरिकेच्या यूएस आर्मी वॉर कॉलेजचे ते पदवीधर होते तसेच त्यांनी मलेशियामध्ये मिलिटरी अॅडव्हायझर म्हणूनही काम केले होते.

मराठा लाईट इन्फंट्रीवरील त्यांचे प्रेम आणि निष्ठा लक्षात घेऊन त्यांची कर्नल ऑफ द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली रेजिमेंटने अनेक यश संपादन केले.

निवृत्तीनंतरही त्यांनी समाजसेवेचे कार्य अखंड सुरू ठेवले. वॉर वुंडेड फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष आणि सेंटर फॉर लँड वॉरफेअर स्टडीज (CLAWS)चे संस्थापक-संचालक म्हणून त्यांनी युद्धात अपंग झालेल्या सैनिकांच्या सन्मान आणि आर्थिक स्वावलंबनासाठी मोठे कार्य केले. “युद्धात अपंग झालेल्या सैनिकांना शहीद जवानांप्रमाणेच सन्मान मिळायला हवा,” असे ते नेहमी म्हणत असत.

वयाच्या ७२ व्या वर्षी कृत्रिम पायावर मुंबई मॅरेथॉन धावत त्यांनी “जिद्द कधीच निवृत्त होत नाही” हे सिद्ध करून दाखवले होते. ते एक अभ्यासू लष्करी विचारवंत आणि लेखकही होते. त्यांनी अनेक पुस्तके, लष्करी लेख आणि संशोधनपर लेखन केले.

त्यांच्या पश्चात पत्नी दौलत ओबेरॉय, दोन मुली, मराठा लाईट इन्फंट्री परिवार आणि असंख्य सैनिक कुटुंबीय असा परिवार आहे. त्यांचे आयुष्य हे शौर्य, जिद्द, कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्तीचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून सदैव स्मरणात राहील.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − eight =

error: Content is protected !!