लोकमान्य ग्रंथालयातर्फे सवलतीच्या दिवाळी अंक योजनेचा शुभारंभ
बेळगाव : वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच दर्जेदार साहित्य वाचकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने लोकमान्य ग्रंथालयातर्फे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या सवलतीच्या दिवाळी अंक योजनेचा शुभारंभ गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.
वरेरकर नाट्य संघ येथील लोकमान्य ग्रंथालयात आयोजित या कार्यक्रमात कार्याध्यक्ष जगदीश कुंटे यांनी उपस्थितांचे स्वागत करून दिवाळी अंक योजनेची माहिती दिली. तसेच ग्रंथालयाच्या सर्व सदस्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी बोलताना डॉ. विनोद गायकवाड म्हणाले की, दिवाळी अंक हे वाचकांना दीर्घकाळ आनंद देणारे साहित्यिक दालन आहे. कथा, कविता, लेख, भविष्य, विनोदी साहित्य अशा विविध साहित्यप्रकारांचा भरगच्च साहित्यिक फराळ दिवाळी अंकांमधून वाचायला मिळतो. नवोदित साहित्यिकांना आपले लेखन प्रसिद्ध करण्यासाठी दिवाळी अंक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देतात. आपणही दिवाळी अंकांपासूनच लेखनाची सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने किमान एक तरी दिवाळी अंक खरेदी करून वाचनसंस्कृतीला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले. उपस्थितांना त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
लोकमान्य ग्रंथालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत सदस्यांना सवलतीच्या दरात ६० हून अधिक दिवाळी अंक वाचण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. यावेळी बुक लव्हर्स क्लबचे सदस्य तसेच ग्रंथालयाचे अन्य सदस्य उपस्थित होते.
