विद्यार्थी संपादक मंडळाच्या मेहनतीला यश; मार्गदर्शक शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन
बेळगाव : छत्रपती शाहू प्रकाशन मंडळ, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मराठी हस्तलिखित स्पर्धेमध्ये मराठी विद्यानिकेतन, बेळगाव या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील कार्याची पुन्हा एकदा दखल घेण्यात आली आहे.
या स्पर्धेतील यशाबद्दल आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे हर्षवर्धन कोळसेकर यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.
या हस्तलिखिताची निर्मिती करण्यासाठी विद्यार्थी संपादक मंडळाने विशेष परिश्रम घेतले. मुख्य संपादक म्हणून वेदांत वीर याने महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. तसेच मार्गदर्शक शिक्षिका माया पाटील आणि स्नेहल पोटे यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. शाळेतील विद्यार्थी आणि मराठी विभागातील शिक्षकांचेही या उपक्रमाला सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, लेखनकौशल्याला आणि सांघिक प्रयत्नांना मिळालेल्या या यशाबद्दल मुख्य संपादक वेदांत वीर, विद्यार्थी संपादक मंडळ, मार्गदर्शक शिक्षिका, मराठी विभागातील शिक्षक आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि विद्यार्थ्यांमधील साहित्यिक गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमातील यशाबद्दल मराठी विद्यानिकेतन परिवाराचे सर्वत्र अभिनंदन!
