बालवीर मराठी विद्यानिकेतन शाळेच्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
बेळगाव : विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच अभ्यासाबरोबर क्रीडा क्षेत्राकडेही लक्ष दिले पाहिजे. अभ्यासामुळे बौद्धिक विकास होतो, तर खेळामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सदृढ राहण्यास मदत होते. त्यामुळे मन आणि शरीर सदृढ ठेवण्यासाठी अभ्यासाबरोबरच खेळही तितकाच महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन युवा समिती सीमाभागचे मुख्य सल्लागार व सामाजिक कार्यकर्ते अशोक घगवे यांनी केले.
बेळगुंदी (ता. बेळगाव) येथील बालवीर फाउंडेशन संचालित बालवीर मराठी विद्यानिकेतन शाळेच्या क्रीडा महोत्सवात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव, उपाध्यक्ष लक्ष्मण चौगुले, निलेश काकतकर तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
पुढे बोलताना अशोक घगवे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळातही आपले कौशल्य विकसित करून क्रीडा क्षेत्रात नाव कमवावे. शैक्षणिक प्रगतीसोबतच शारीरिक संपदाही तितकीच महत्त्वाची आहे. बेळगाव शहरात खेळाडूंसाठी पुरेशी मैदाने उपलब्ध नसताना बालवीर संस्थेने विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त क्रीडांगण उपलब्ध करून दिले आहे. हा उपक्रम कौतुकास्पद असून संस्थेचे त्यांनी अभिनंदन केले.
बेळगाव शहरात खेळाडूंना सरावासाठी आणखी क्रीडांगणे उपलब्ध करून देण्यासाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी मानवंदना देऊन उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.
