सेवा-संस्कारातून राष्ट्रनिर्मितीचा संदेश; सागर बी. एड्. प्रशिक्षण शिबिरात व्याख्यान व वृक्षारोपण

सेवा-संस्कारातून राष्ट्रनिर्मितीचा संदेश; सागर बी. एड्. प्रशिक्षण शिबिरात व्याख्यान व वृक्षारोपण

बेळगाव : सागर बी. एड्. महाविद्यालयातर्फे आयोजित नागरिक प्रशिक्षण शिबिरांतर्गत बेनकनहळ्ळी येथे भारत विकास परिषदेच्यावतीने “सेवा व संस्कार” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देण्यात आला.

कार्यक्रमात डॉ. जे. जी. नाईक, प्रा. अरुणा नाईक आणि भारत विकास परिषदेच्या राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्य स्वाती घोडेकर यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर सागर बी. एड्.चे प्राचार्य आर. व्ही. हळब, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे, प्रांत संगठन सचिव विनायक घोडेकर, डी. वाय. पाटील आणि डॉ. नवीनकुमार उपस्थित होते.

प्रारंभी प्रशिक्षणार्थींनी प्रार्थना व स्वागतगीत सादर केले. प्राचार्य आर. व्ही. हळब यांनी रोपटे व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना डॉ. जे. जी. नाईक यांनी सेवाकार्य निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून करण्याचे आवाहन केले. राष्ट्रनिर्माणासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. अरुणा नाईक यांनी शिक्षकांची समाजघडणीत महत्त्वाची भूमिका अधोरेखित करत भावी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत चांगले संस्कार देण्याचे आवाहन केले. अभ्यासूवृत्ती, चारित्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यावर त्यांनी भर दिला.

स्वाती घोडेकर यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य करताना निरपेक्ष भावनेने विद्यार्थी घडवण्याचे महत्त्व सांगितले. समाजसेवा, राष्ट्रकार्य आणि महिला सबलीकरण याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.

प्राचार्य आर. व्ही. हळब यांनी भारत विकास परिषदेच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी एस.बी.जी. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे सहकार्य लाभले. भाग्यश्री पाटील व सविता वाली यांनी सूत्रसंचालन केले. विनायक घोडेकर आणि डी. वाय. पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. डॉ. एम्. बी. नरसन्नावर यांनी आभार मानले. कार्यक्रमास परिषद सदस्य, प्राध्यापक आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 − 7 =

error: Content is protected !!